भाडेतत्त्वावरील उपहारगृह सोडण्यास सांगितल्यामुळे आत्महत्या   

पुणे : भाडेतत्त्वावर घेतलेले उपहारगृह सोडण्यास सांगितल्यामुळे एकाने आत्महत्या केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. उपहारगृह चालकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला.महेश साखरे (वय ४२, महादेवनगर, मांजरी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या उपहारगृह चालकाचे नाव आहे. साखरे यांची पत्नी दीपाली (वय ३८) यांनी याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून, गणेश भालचंद्र घुले (वय ५०), रोहिणी संदीप तुपे (वय ४९), प्रशांत पुजारी (वय ३५), नीलेश उत्तम घाडगे (वय ३२) आणि सचिन जयराम शिंदे (वय ४५, सर्व रा. मांजरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
मृत महेश साखरे यांनी मांजरी भागात काही महिन्यांपूर्वी उपहारगृह सुरू केले होते. उपहारगृह सुरू करण्यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. तसेच, काही जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. उपाहारगृह सुरू करण्यापूर्वी त्यांनी आरोपींसोबत करार केला होता. कराराची मुदत संपण्यापूर्वी आरोपींनी त्यांना उपाहारगृहाचा ताबा सोडण्यास सांगितले. तसेच, पैसे परत करण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता. त्यांच्या त्रासामुळे महेश यांनी १० मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींच्या त्रासामुळे पतीने आत्महत्या केल्याचे दीपाली साखरे, यांनी तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक दीपक बर्गे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles